गा गीत तू सतारी गा गीत आसवांचे
या जीवनात वेडे नाही कुणी कुणाचे
हो गा गीत तू सतारी
किती रंग गंध हळवे फुलती भल्या पहाटे
होता दुपार विरती निमिषात सांज दाटे
काळोख पीत येती स्वर मंद काजव्याचे
गा गीत तू सतारी
पंखांत ऊब घेते पिल्लू मुक्या खगाचे
चोचीत गोड दाणा घेण्यास जीवनाचे
पिल्लास पंख फुटता घर शून्य पाखराचे
गा गीत तू सतारी
टाक्यापरी सुईच्या स्वर आर्त छेद सारे
ते सांधती मनाचे आभाळ फाटणारे
गाण्यापरी जिण्याला आकार भावनांचे
गा गीत तू सतारी गा गीत आसवांचे
या जीवनात वेडे नाही कुणी कुणाचे
हो गा गीत तू सतारी